Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

'राष्ट्रीय आदर्श महिला गौरव' पुरस्काराने शिक्षिका हसीना शेख यांचा सन्मान


'राष्ट्रीय आदर्श महिला गौरव' पुरस्काराने शिक्षिका हसीना शेख यांचा सन्मान 

जनता न्यूज | दि.२१/०३/२०२३

आदर्श फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श महिला गौरव पुरस्कार वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आदर्श शिक्षिका हसीना शेख यांना नुकताच प्रदान करण्यात आला. 

लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी आपल्या शिक्षकी कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या हसीना शेख यांनी पलूस तालुक्यातील पद्मानगर,पलूस,बांबवडे येथे उपशिक्षिका आणि भिलवडी स्टेशन येथे विषय शिक्षिका म्हणून आपल्या कार्याची छाप सोडली.पंचायत समिती पलूस येथे विषयतज्ञ म्हणून तीन वर्ष आणि गटसमन्वयक म्हणून सहा वर्ष कामकाज पाहिले.सांगली जिल्ह्यात गटसमन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या केवळ दोन महिलांतील त्या एक होत्या.

शिक्षक म्हणून काम करत असताना,त्यांनी विविध उपक्रम राबविले. शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून त्यांनी जिल्हाभर नावलौकिक मिळविला.लोकवर्गणी जमा करणे, शैक्षणिक उठाव करणे या माध्यमातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन शाळा सुसज्ज केल्या आहेत. आजवर काम केलेल्या प्रत्येक शाळेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन शाळेला विविध पारितोषिके मिळवून दिली आहेत.शैक्षणिक साहित्य निर्मिती, विज्ञान प्रदर्शन आदी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन भरघोस यश मिळविले आहे. विविध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडली आहे.

शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही त्या अग्रभागी असतात. दरवर्षी एका विद्यार्थ्यांला दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करतात. याचबरोबर वेळोवेळी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अन्नधान्य,कपडे आदी सुविधा उपलब्ध करून देत असतात.विविध सेवाभावी संस्थांकडून अशा लोकांना मदत मिळवून देण्यातही त्या अग्रेसर असतात.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्या काम करीत आहेत.त्या उत्तम कवयित्री-लेखिका देखील आहेत.त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही अशा पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अँबॅकस स्पर्धेत अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. जिल्हास्तरावर विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल आदर्श फाउंडेशन सांगली  या संस्थेने घेतली आणि त्यांना राष्ट्रीय आदर्श महिला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.