सुसंस्कृत कर्तुत्वान युवा नेतृत्व -डॉ.विश्वजीत कदम
- प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे
भारती विद्यापीठाचे,
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली
माजी सदस्य,व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
सर्व पक्षी पावसात आसरा शोधतात!
गरुड मात्र मेघांच्याही वर उडणे पसंत करतो!!
प्रश्न सर्वत्र सारखेच असतात!
फक्त दृष्टीकोन वेगळा असावा लागतो!!
या उक्तीप्रमाणे आजच्या आधुनिक युगात समाजातील नव्या जाणिवांचा ध्यास घेत, तरुण पिढीच्या विविध प्रश्नांचा विचार व लोकशाही मुल्यांची जोपासना करीत समाज परिवर्तनाचे अखंडित कार्य करुन सर्वसामान्यांचे जीवन तेजोमय करुन महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा निर्माण करणारे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व महाराष्ट्राचे माजी अन्न व नागरी पुरवठा, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (बाळासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त...
आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा अगदी आतून उमटणाऱ्या हृदय भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. सुसंस्कृत, कर्तुत्वान व विनयशील नेतृत्व असणारे भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांचे अष्टपैलू कर्तृत्व व्यक्त करण्यांचा माझ्या आयुष्यातील हा क्षण अगदी तसाच आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असे फार थोडे नेते आहेत. ज्यांच्या सुपुत्रांनी आपल्या वडिलांचे सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रातील विकासाचे कार्य अधिक वेगाने मोठे करून दाखवलेले आहे. अशा युवा नेत्यामध्ये प्राधान्यक्रमाने तोंडामध्ये नाव येते ते माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे. गरजवंतांना मदत करणं आणि एकही मिनिट वाया न दवडता समाजकार्यासाठी सतत कार्यमग्न राहणं हे संस्कार बाळासाहेबांना डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्याकडून मिळालेली आहेत.राजकारणाचा आणि समाजकारणाचा आपल्या वडिलांकडून लाभलेला समृद्ध आणि संपन्न वारसा बाळासाहेब समर्थपणे पुढे चालवत आहेत. वडिलांची श्रमनिष्ठा, जनसामान्यांनाचे कल्याण व आईची शिस्तप्रियता, संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन नाविण्यांचा ध्यास घेत बाळासाहेबांचे कर्तृत्व अल्पावधीतच झळाळून निघाले आहे. कुटुंबात नात्याला, मैत्रीत जिव्हाळ्याला, राजकारणात समाजकारणाला, समाजकारणात परिवर्तनाला, कृषीक्षेत्रात शेतकर्यांच्या विकास, शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या इच्छा-आकांक्षांना, संशोधन क्षेत्रात नवनिर्माणाला, सहकारात प्रगतीला, क्रीडाक्षेत्रात उदयन्मुख खेळाडूंच्या प्रोत्साहनाला आणि कलाक्षेत्रात कलावंतांच्या सन्मानाला बाळासाहेब नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक उत्तरदायित्वाला आपल्या जीवनात प्राधान्य देणारे बाळासाहेब यांच्या कार्यशैलीची व निसीम पक्षनिष्ठेची तसेच सर्व व्यापक नेतृत्वाची दखल कॉंग्रेस पक्षाने घेऊन महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी बाळासाहेबांच्या कडे दिली होती. ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व समर्थपणे बाळासाहेबांनी सांभळली आहे. हे त्यांनी या कालावधीत केलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यातून दिसून येते. यातूनच बाळासाहेबांच्या प्रगल्भ दूरदृष्टीची, आश्वासक व प्रेरक नेतृत्वाची साक्ष पटते.
'युवकांनो स्वप्ने पहायला शिका' ही स्वप्नेच तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतील आणि त्यातूनच भारताला महासत्ता करण्याची प्रेरणा मिळेल, असा संदेश देणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचाराने व ध्येयाने प्रेरीत असणारे बाळासाहेब सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून महाराष्ट्रातील युवकांच्यात चैतन्यदायी सकारात्मक उर्जा निर्माण करीत आहे. बाळासाहेबांनी नवोदित युवा नेतृत्वाच्या स्वप्नांना बळ देण्याचे जे कार्य केलेले आहे, ते खरोखरचं कौतुकास्पद आहे. याचा मला आनंद वाटतो.
समाजातील प्रत्येक क्षेत्रातील घटकाच्या विकास करिता निर्णय घेण्यासाठी त्या संदभातील खडा न् खडा माहिती असणे महत्वाची असते.त्यासाठी साधना करावी लागते. या कामासाठी दिवसाचे चोवीस ताससुध्दा कमी पडतात. हे असे घडयाळाबरोबर धावत राहून काम करत राहणे केवळ मोठेपणाचे लक्षण नसून छोटयातल्या छोटया प्रश्नाला न्याय देण्यासाठी स्वत:साठी आखून दिलेला तो एक प्रशस्त मार्ग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या मार्गाने जाणारे बोटावर मोजण्याइतकेच युवक नेतृत्व आहे.त्यामध्ये प्राधान्य क्रमाने नांव घ्यावे ते संवेदनशील मनाचे, सह्रदयी, दिलदार नेतृत्व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम यांचे होय. याचे कारण वैश्विक महामारी करोनाच्या कालावधीमध्ये बाळासाहेबांनी केलेले नेत्रदीपक कार्य तसेच महापुराच्या वेळी सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेले भरीव कार्यच अष्टपैलू नेतृत्व व कुटुंब वत्सल पालकत्वाची साक्ष देतात.
दुष्काळ असो अथवा महापूर यासारख्या नैसर्गिक संकटाच्या वेळी सर्वसामान्य जनतेच्या खांद्याला खांदा लावून लढणारे व त्यांना सर्वतोपरी मदत करणारे बाळासाहेब वैश्विक महामारी ठरलेल्या करोनाच्या विरूद्धच्या लढाईत एखाद्या योध्द्याप्रमाणे लढलेले आहेत. जो संकटाच्या वेळी धावून येतो तोच खरा देवदूत असतो अशी आपल्या समाजात भावना आहे. खरोखरच करोनाच्या कालावधीत लोकांना बाळासाहेबांच्या रुपाने देवदूत दिसले. या संकटकाळात जनसामान्यांच्या काळजीने संवेदनशील मनाच्या या नेत्याने वैद्यकीय, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्याबरोबर सर्वांचे मनोबल वाढविले. करोनाच्या सर्व रुग्णांना दवाखान्यामध्ये व घरी जाऊन धीर दिला. सामान्य माणसांना तसेच शेतकरी वर्गाला ही दिलासा दिला. प्रशासनातील आपले कौशल्य पणाला लावून महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाला गतिमान केले. सांगली जिल्ह्यातील करोनाग्रस्त गावांना भेटी दिल्या. या गावातील लोकांना भयभीत न होण्याचे आणि काळजी घेण्याचे आव्हान करीत जनजागृती केली. त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात होते.
भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून पुणे व सांगली याठिकाणी कोव्हीड सेंटर उभा करून हजारो रुग्णांना बरे केले. भारतीय विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखाना व शासनाच्या माध्यमातून करोनाग्रस्ता करिता जे काही करु येईल ते सर्वकाही बाळासाहेबांनी केलेले आहे. पलूस कडेगाव मतदार संघात प्रत्येक कुटुंबाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्ब्युम या होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले. तसेच बँका एम.एस. ई. बी. , सर्व दवाखाने, सर्व शासकीय , निमशासकीय व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत सॅनिटायझर्स बाटल्या देण्यात आल्या. लॉकडाउनच्या कालावधीत परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनियाजी गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळासाहेबांनी पुणे ते लखनऊ आणि सांगली ते गोरखपुर अशा दोन श्रमिक ट्रेनमधून २५ हजार मजुरांच्या प्रवास खर्चाची व जेेवणाची व्यवस्था केली. त्यामुळेच हे सर्व परप्रांतीय लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आपापल्या घरी सुखरूप पोहोचले.
कोरोना संकटाच्या काळात कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करत आहेत, त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.बाळासाहेबांच्या या नेत्रदीपक कार्याची माझ्या सहित अनेक जण साक्षीदार आहेत.
माझ्या कोरोनाच्या आजारपणात मला आलेला बाळासाहेबांचा वैयक्तिक अनुभव खूप महत्वाचा आहे. माझ्या सहित माझी पत्नी कोरोनाग्रस्त असताना भारती हॉस्पिटल पुणे येथे आम्ही ऍडमिट होतो. या काळात बाळासाहेबांनी व्यक्तीशः मला खूप आधार दिला. माझी फोन करून चौकोशी केली तसेच भारती हॉस्पिटल मध्ये येऊन कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराच्या योग्य त्या सूचना देऊन आमच्या कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले. सुखदुःखात सहभागी होणारे हे नेतृत्व आज सर्वसामान्यांचा आधारवड बनलेलेआहे.
डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी शिक्षण, सहकार, राजकारण,समाजकारण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करुन महाराष्ट्राला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले. अथपासून इतिपर्यंतचा त्यांचा हा जीवनप्रवास खरंतर परखड अनुभवातून आविष्कृत झाला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत व ग्रामीण जनतेचा कणा असणारे मा.आ. मोहनराव कदम यांच्याकडून उज्ज्वल भविष्याची प्रेरणा घेत आणि स्वकर्तृत्वाचा मेळ घालत बाळासाहेबांनी आपल्या शैक्षणिक, सहकार, आणि सामाजिक कार्याची दमदार वाटचाल सुरु केलेली आहे. उभरत्या वयामध्ये चौफेर कामगिरी करणाऱ्या बाळासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुरु केलेले काम पाहिले की अष्टपैलू नेतृत्वाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, प्र-कुलगुरू- भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय कार्यवाह-भारती विद्यापीठ, अध्यक्ष-बालगंधर्व स्मारक समिती नागठाणे, उपाध्यक्ष,भारती सहकारी बँक लि. पुणे, संचालक -सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. वांगी, संचालक-सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या.कडेगांव, अध्यक्ष दक्षिण भारत फुटबॉल असोसिएशन, अशा कितीतरी जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे हे युवा नेतृत्व आज अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. बाळासाहेबांच्या कामाचा आवाका पाहिला, वाडयावस्त्यांपासून महानगरापर्यत आणि गल्लीपासूत् दिल्लीपर्यत विखुरलेले त्यांचे मित्र, चाहते, हितचिंतक,अनुयायी, शिलेदार पाहिले की याची साक्ष पटते.
प्रसन्न मुद्रा, मृदूवाणी असलेले आणि कामाचा प्रचंड आवाका असणारे डॉ.विश्वजीत कदम गरिबांपासून श्रीमंतापर्यंत व लहानापासून थोरापर्यंत सर्वाचे लाडके आहे. एक धाडसी, सर्वगुणसंपन्न युवा नेता, कार्यसम्राट मंत्री म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे.
भारती विद्यापीठ या संस्थेच्या एका शाखेचा प्रमुख या नात्याने काम करताना वेळोवेळी प्रशासकीय मार्गदर्शनाची गरज भासते. त्यावेळी बाळासाहेबांनी क्षणार्धात निर्णय व अचूकपणे केलेले मार्गदर्शन
माझ्यासारख्यांना मोहरुन टाकते. प्राचार्यांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या सूचना शिक्षणक्षेत्रातील मुरब्बी माणसासारख्या असतात. भारती विद्यापीठामध्ये 'हायटेक मॅनेजमेंट सिस्टीम' राबविणारे बाळासाहेब हे २१ व्या शतकातील आधुनिक शिल्पकार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाविद्यालयातील अध्ययनाबरोबरच संशोधनावर अधिक भर द्यावा,याविषयी ते आग्रही असतात. सभोवती आनंदाचा मळा फुलवत स्वतःला सतत कसं कार्यक्षम ठेवायचं हे बाळासाहेबांच्या कडून शिकावं! विविध पदाची जबाबदारी सांभाळत त्यांचं वाचन, चिंतन आणि लेखन सातत्याने सुरू असते या आम्हा सर्वांच्या दृष्टीने प्रेरणादायी असं आहे.
उतम संस्काराची शिदोरी ज्यांना लाभते ते खरेच भाग्यवान असतात. त्यादृष्टीनेही बाळासाहेब भाग्यवान आहेत. दिग्विजयी पिता डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या आदर्शाची वीणा खांद्यावर बाळगून जनताजर्नादनाच्या कल्याणासाठी नव्या शतकाचा पुरोगामी वेध घेत दमदारपणे बाळासाहेबांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. निगर्वी, विनयशील आणि लहानांना समजून घेणारे, समवयस्कांना बरोबर घेणारे, वडिलधाऱ्यांचा आदर ठेवणारे बाळासाहेबांशी संवाद साधताना सत्ता, संपत्ती आणि पदे या कधीच आड येत नाहीत.
व्यक्तिमत्त्वाची ही श्रीमंती लाभलेले बाळासाहेब आपली प्रगतीच्या, परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या दिशेने चाललेली घोडदौड भविष्यात अधिक गतीमान होवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

