Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

महाराष्ट्राच्या निर्मिती संघर्षाचे हे पर्व - असे अस्तित्वात आले मराठी भाषिकांचे राज्य - महाराष्ट्र


महाराष्ट्राच्या निर्मिती संघर्षाचे हे पर्व - असे अस्तित्वात आले मराठी भाषिकांचे राज्य 

जनता न्यूज l दि.१/५/२०२३

भारतीय संघराज्यात राज्यांची निर्मिती ही भाषेनुसार करण्यात आली आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या आधारे राज्य निर्मितीची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी होत होती. इ. स.१९४६ पासून ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ महाराष्ट्रात सुरू झाली. खूप मोठा संघर्ष करून १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आजच्या या लेखात महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याची माहिती घेऊ या.

पार्श्वभूमी :

विसाव्या शतकाच्या प्रारंभी ला च मराठी भाषिक लोकांच्या ए कीकरणाचा भावना व्यक्त होऊ लागली होती. त्यावेळी इ. स.१९११ ला ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली होती. एक भाषिक राज्याचे दोन भागात विभाजन केले होते,ते रद्द करण्यात आले. त्यामुळे एकच भाषा बोलणाऱ्या लोकांचे एक राज्य असावे या भावनेला जोर मिळाला. त्यानुसारच न. चिं. केळकर यांनी आपले विचार व्यक्त केले की मराठी भाषा बोलणारी सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी.

त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सुध्दा १९१५ मध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. परंतु ही भाषावार प्रांतरचनेची मागणी त्यावेळेस जोर धरू शकली नाही. कारण भारत त्यावेळी स्वतंत्र झाला नव्हता. देशाला अगोदर पारतंत्र्यातून मुक्त करणे ही भावना वाढीस लागली होती. मात्र मराठी भाषिक लोकांच्या राज्याची मागणीला येथून सुरुवात झाली होती. यानंतर काही काळाने १२ मे १९४६ ला बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र राज्या चा ठराव संमत करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण परिषद :

मुंबई येथे श्री शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये काही ठराव मंजूर करण्यात आले. त्यानुसार मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा. यामध्ये मुंबई,मराठवाडा,गोमंतक आणि मध्य प्रांतातील मराठी भाषिक प्रदेश यांचा समावेश करावा.

दार कमीशनची स्थापना :

भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १७ जून १९४७ ला न्यायाधीश एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमीशन ची स्थापना केली. दार कमीशनचा अहवाल १० डिसेंबर १९४८ ला घोषित करण्यात आला. परंतु या कमीशन मुळे कोणताही प्रश्न सुटला नाही.

त्रिसदस्यीय समिती :

काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेच्या अभ्यासासाठी २९ डिसेंबर १९४८ ला एक समिती स्थापन केली. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभि सीतारामय्या हे तीन नेते होते. या नेत्यांच्या नावाच्या आद्याक्षराहून ही त्रिसदस्यीय समिती जे. व्ही. पी. समिती म्हणून ओळखली जाते.

ह्या समितीने जो अहवाल दिला होता त्यातून महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला. या समितीने आपल्या अहवालात म्हटले होते की, भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्त्वता मान्य आहे. पण ही वेळ त्यासाठी योग्य नाही. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा ठराव मांडला.

हा ठराव ५० विरुद्ध ३५ मतांनी सं मत ही झाला. त्याच वेळेस सेनापती बापट यांनी जनते मध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभात फेऱ्या काढल्या. महाराष्ट्रात असंतोष होण्यास सुरुवात झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा मिळत होता.

राज्य पुनर्रचना आयोग :

तत्कालीन केंद्र सरकारने न्यायमूर्ती एस.फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ ला ‘ राज्य पुनर्रचना आयोग ‘

स्थापन केला.१० ऑक्टोबर १९५३ ला या आयोगाने अहवाल सादर केला.त्यानुसार मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण केले जावे अशी शिफारस केली.

नागपूर करार :

१९५३ मध्ये नागपूर येथे झालेल्या करारा नुसार सर्व मराठी भाषिक लोकांचे एक राज्य स्थापन म्हणजेच Maharashtra Rajyachi Nirmiti करण्यात यावे. त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी. विकास कामासाठी समन्यायी निधी व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी पर्याप्त निधी लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय नोकऱ्या देण्यात याव्या. तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचे वार्षिक एक अधिवेशन ( हिवाळी अधिवेशन ) नागपूरला घेण्यात यावे असे या करारानुसार ठरले.

मुंबईतील कामगार मैदानावरील सभा :

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू झाले.याच चळवळी अंतर्गत मुंबईतील कामगार मैदानावर एक मोठी सभा घेण्यात आली. त्या सभेला संबोधित करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे धडाडीचे नेते शंकरराव देव म्हणाले होते की,महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आम्ही प्राणपणाने लढू. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी ला आता जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कामगारांची सभा :

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या अध्यक्षीय सभेत विविध कामगार संस्था,कम्युनिस्ट,समाजवादी शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघ असे पक्ष सहभागी झाले होते.याच सभेत एस. एम. जोशी यांनी असा ठराव मांडला होता की मुबई आणि विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा.

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 

महाराष्ट्रात मराठी भाषिक लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी ची लाट निर्माण होत होती. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर खूप मोठा मोर्चा निघाला होता.

पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून मोर्चा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याचदिवशी कामगार मैदानावर सायंकाळी सुमारे ५० हजार लोक जमले होते. या जनसमुदायाला कॉम्रे ड डांगे यांनी संबोधित केले. २१ नोव्हेंबर १९५५ ला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला गेला.

राज्यभरात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोर धरू लागला होता. त्यातच ६ फेब्रुवारी १९५६ ला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. या सभेत संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली कार्यकारिणी गठित केली. त्यानुसार कॉम्रे ड श्रीपाद अमृत डांगे हे अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. टी. आर.नरवणे तसेच सचिवपदी एस. एम.जोशी यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना करण्यात आचार्य अत्रे,प्रबोधनकार ठाकरे, मधू दंडवते सेनापती बापट,क्रांतिसिंह नाना पाटील,अहिल्याबाई रांगणेकर आणि लालजी पेंडसे अशा मोठमोठ्या लोकांनी सहकार्य केले होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ जण हुतात्मा :

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फोफावत होती. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या तयारीत नव्हती. त्यामुळे त्या वेळी खूप मोठे आंदोलन सुरू झाले. अशाच एका आंदोलनात राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती साठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या या १०६ जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा स्मारक मुंबईतील फ्लोरा फाऊंटन जवळ उभारले गेले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी :

या आंदोलनात मराठी वृत्तपत्रांनी महत्त्वपुर्ण कामगिरी पार पाडली. आचार्य अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्राने महत्त्वपुर्ण कामगिरी बजावली. याखेरीज प्रबोधन,सकाळ, प्रभात,केसरी,नवाकाळ आणि नवयुग या वृत्तपत्रांनी देखील आपले योगदान दिले.

याखेरीज बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून या चळवळीत आपले योगदान दिले मराठी शाहिरांनी देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी ची धार तेज ठेवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.ना.गवाणकर यांनी आपल्या शाहिरीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.

निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला यश :

दिनांक १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. याचा प्रचंड परिणाम मराठी जनमानसावर झाला. १९५७ ला झालेल्या लोकसभा,विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात संयुक्त महाराष्ट्र समिती ने आपले उमेदवार उभे केले होते. यात संयुक्त महाराष्ट्र समिती ला फार मोठे यश मिळाले. यावरून मराठी जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहे हे सिद्ध झाले.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 

३० नोव्हेंबर १९५७ ला प्रतागडावरील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते होणार होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती ने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. या मोर्चाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यावेळी प्र. के.अत्रे,ना. ग.गोरे, एस. एम.जोशी,जयंतराव टिळक इत्यादी मोठी मंडळी सहभागी होती.

संयुक्त महाराष्ट्र समिती ने पसरणी घाट आणि पोलादपूर जवळ तीव्र निदर्शने केली होती. यातून पंतप्रधान पंडित नेहरू यांना मराठी भाषिकांच्या भावना आणि महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीची जाणीव झाली. हे समितीचे फार मोठे यश होते. इतक्या नेटाने संयुक्त महाराष्ट्र समिती ने आपला लढा दिला त्याला शेवटी यश आले. केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यास तयार झाले.

त्यातच तत्कालीन काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधींनी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या बाजूने निर्णय दिला. एप्रिल १९६० मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा संमत केला. त्यानुसार १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रासोबतच गुजरात हे देखील भाषिक राज्य निर्माण झाले. १मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री बनले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.