सुभाष कवडे यांना साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार जाहीर
जनता न्यूज - भिलवडी l दि. ६/३/२०२३
साने गुरुजी संस्कार साधना पुणे या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणारा साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार - २०२३ भिलवडीचे वाचन व संस्कार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते साहित्यिक वक्ते सुभाष कवडे यांना जाहीर झाला.
साने गुरुजी संस्कार साधना पुणे हि संस्था महाराष्ट्रातील एक नामवंत सामाजिक संस्था असून गेली ४५ वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेतर्फे समाजातील तळागाळात जाऊन वाचन व संस्कार या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शोधून हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो.
यंदाचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार गेली २५ वर्षे सार्वजनिक वाचनालय भिलवडी व पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या माध्यमातून वाचन चळवळ रुजविणे व शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे या श्री.कवडे यांच्या प्रदीर्घ कार्याची नोंद घेऊन संस्थेने त्यांना साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार जाहीर केला आहे संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ.दिलीप गरुड यांनी पुणे येथे नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली.
श्री.सुभाष कवडे गेली २५ वर्षे सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह असून वाचन चळवळ रुजविण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत तसेच पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांवर सुसंस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे श्री.कवडे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेचे कार्यवाह पद सलग १५ वर्षे सांभाळून संस्थेच्या प्रगतीत योगदान दिले आहे श्री.कवडे हे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक असून आजवर त्यांची १४ पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत
पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी पुणे येथे एस.एम.जोशी सोशल फौंडेशनच्या सभाग्रहात संपन्न होणार आहे सदर पुरस्कार वितरण महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी यांचे हस्ते होणार असून सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ.दिलीप गरुड आहेत रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेली ४५ वर्षे सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या साने गुरुजी संस्कार साधना पुणे या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार श्री.कवडे यांना जाहीर झाल्यामुळे त्याच्या आजवरच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेतल्याबद्दल श्री.कवडे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.